नौजवान भारत सभा कडून बिल्कीस बानोच्या बलात्काऱ्यांना गुजरात सरकारने कैदेतून सोडून दिल्याच्या विरोधात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

आज नौजवान भारत सभा कडून बिल्कीस बानोच्या बलात्काऱ्यांना गुजरात सरकारने कैदेतून सोडून दिल्याच्या विरोधात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. 2002 च्या गुजरात दंगलीच्या वेळी बिल्कीस बानो गर्भवती असताना तिच्यावर 11 जणांनी बलात्कार केला आणि तिच्या 14 कुटुंबीयांना मारून टाकण्यात आले ज्यामध्ये तिची तीन वर्षाची मुलगी सुद्धा होती. ज्यांनी हे कृत्य केले त्यांना गुजरात सरकारने त्यांची शिक्षा पूर्ण होण्याअगोदरच सोडून दिले आहे. इतकेच नाही तर त्यांचे हार, पेढे घालून स्वागत सुद्धा केले. सोडण्या अगोदर सुद्धा यापैकी अनेक गुन्हेगारांना अनेकदा पॅरोलवर सतत बाहेर सोडले जात होते हे सुद्धा समोर आले आहे. सोडण्याच्या निर्णय न्यायालयाचा नाही तर फक्त भाजप सरकारचाच आहे हे सुद्धा स्पष्ट आहे! तेव्हा, बेटी बचाओ, बेटी पढाओ नारा देणाऱ्या फॅसिस्ट भाजप सरकारचे यातून स्त्री विरोधी चरित्र पुढे आले आहे. भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांसारख्या प्रतिगामी शक्ती एकीकडे स्त्रीची पूजा करण्याच्या गोष्टी करतात आणि दुसरीकडे मात्र याच संघटनांचे कार्यकर्ते बलात्काऱ्यांचे सत्कार करताना दिसतात. या संघटनांचे चरित्र ओळखले पाहिजे आणि यांच्या विखारी प्रचाराला बळी न पडता स्त्री-अत्याचाराविरोधात सर्व जाती-धर्मातील मेहनत करणाऱ्यांची एकजूट उभी केली पाहिजे असे यावेळी नौभासचे सुस्मित यांनी मांडले. आंदोलनात भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष, स्त्री मुक्ती लीग सुद्धा सहभागी होते.

Related posts

Leave a Comment

2 × five =