अतिरिक्त नुकसान भरपाई करिता विविध वसाहतींमधील नागरिक एकजूटदिनांक 3 नोव्हेंबार रोजी आंबिल ओढा (पुणे) परिसरातील *129 दांडेकर पूल, 130 दांडेकर पूल, 133 दांडेकर पूल, 134 दांडेकर पूल, 214 दांडेकर पूल, आंबेडकर वसाहत, टांगेवाला कॉलनी, राजेंद्रनगर , अण्णाभाऊ साठे वसाह्त,* येथील 200 पेक्षा जास्त पूरग्रस्त नागरिकांनी मिळून, नौजवान भारत सभेच्या समन्वयाने एकत्र येऊन, निळू फुले सभागृह (साने गुरुजी शाळा परिसर) येथे आंबिल ओढा पुरग्रस्त नागरिक संघर्ष समिती स्थापन केली आहे.
सरकार देऊ करत असलेली रु. *15,000 मदत ही अत्यंत अपुरी आहे* आणि उपजिवीका, जीवनावश्यक वस्तू, रोजगार, घर, मुलांचे शालेय साहित्य, आरोग्याचा खर्च यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी अत्यंत तोकडी आहे असा विचार उपस्थित सर्व वसाहतींमधील नागरिकांनी मांडला. यावेळी *राजेंद्रनगर येथून हिना शेख, कल्पना गायकवाड, 129 दांडेकर पूल येथून पूनम बोडके, 130 दांडेकर पूल येथून सागर ढावरे, 214 दांडेकर पूल येथून सारिका शिंदे आणि वंदना ताई, 133 दांडेकर पूल येथून हनुमंत कांबळे, 134 दांडेकर पूल येथून राम खंडागळे, आंबेडकर वसाहत येथून गुल मोहमंद शेख* यांनी प्रत्येक ठिकाणी झालेल्या प्रचंड नुकसानीचे वर्णन करत सरकारी अनास्थेबद्दल प्रचंड संताप व्यक्त केला.
यावेळी बोलताना नौजवान भारत सभेचे डॉ. निखिल एकडे यांनी मांडले की आत्तापर्यंतचे सर्व सरकार आदेश (जी.आर.) फक्त रु. 15,000 मदत देण्यापर्यंतच मर्यादित आहेत, त्यामुळे 25 सप्टेंबर रोजी झालेल्या पुराच्या नुकसानीची व्याप्ती पाहता आपदे संदर्भात बनलेल्या *मंत्रीमंडळाच्या उपसमितीने विशेष पॅकेज सर्वांसाठी जाहिर करणे आवश्यक आहे.* शेतकरी, हस्तकला, मासेमार यांच्या उपजीविकेच्या साधनांना नुकसान भरपाई दिली जाते, जे योग्यच आहे, परंतु सर्वांनाच अशी भरपाई दिली गेली पाहिजे असे त्यांनी मांडले.
यानंतर *रु. 30,000 अतिरिक्त नुकसान भरपाई, उपजीविकेच्या साधनांची नुकसानभरपाई, मुलांच्या शाळा कॉलेजच्या वह्या पुस्तकांची मदत तसेच फी माफी, ज्यांचे घर उध्वस्त झाले आहे त्यांना बाजारभावाने घरभाडे, आजाराचा खर्च, वीज बील माफी आणि कागदपत्रे उपलब्ध करून देणे या मागण्यांकरिता राज्य शासनासोबत एकजुटीने संघर्ष करण्याचा निर्धार सर्व पुरग्रस्तांच्या वतीने करण्यात आला. तसेच ओढ्याची भिंत बांधणे, विना भेदभाव बाधितांचे पुनर्वसन, आणि सांडपाण्याच्या व्यवस्थेच्या संदर्भात* पुणे मनपाकडेही पाठपुरावा करण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला.
