दि. 22 ऑक्टोबर 2021 रोजी नौजवान भारत सभेतर्फे पुण्यातील 214, दांडेकर पूल भागात हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन (HRA) चे सदस्य व काकोरी कटातील शहीद अश्फाकउल्ला खान यांच्या जन्मदिवशी शहीद भगतसिंह वाचनालयाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिकारी गीत व घोषणांनी करण्यात आली. नौभास तर्फे डॉ. निखिल यांनी मांडले की नौजवान भारत सभा हे शहीद भगतसिंह व त्यांच्या क्रांतिकारी साथीदारांच्या विचारांवर काम करणारे संघटन आहे. शाहीदांच्या अपूर्ण स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी; म्हणजेच एका अश्या समाजाच्या निर्मितीसाठी ज्यात माणसाकडून माणसाचे शोषण होणार नाही, ज्यात सर्व कारखाने, शेतीबागा, संपत्ती निर्माण करणारी साधने ह्यांवर कामगार-कष्टकरी वर्गाची सामूहिक मालकी असेल; नौजवान भारत सभा संपूर्ण देशभरात कामगार-कष्टकरी वस्त्यांमध्ये काम करते. त्यांनतर साथी रवि यांनी शहीद अश्फाकउल्ला खान यांच्या क्रांतिकारी कार्याबद्दल माहिती देत सांगितले की आजच्या वाढत्या संप्रदायिकतेच्या काळात अश्फाकउल्ला खान व रामप्रसाद बिस्मिल यांच्या मैत्रीचा वारसा पुढे चालवत आपापसातील जाती-धर्माचे झगडे विसरून खऱ्या प्रश्नांसाठी संपूर्ण कामगार-कष्टकरी जनतेने एकजूट होणे गरजेचे आहे.
कार्यक्रमाला वस्तीतील कामगार कष्टकरी महिला व पुरुषांचा, तरुणांचा तसेच लहान मुलांचा देखील उत्तम प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वाना आर्थिक व वेळेच्या सहयोगाचे आव्हान करण्यात आले व कार्यक्रमाची सांगता क्रांतिकारी गीताने झाली.
