मुंबई येथे “मृत्यू आणि निराशेचे कारखाने” ह्या माहितीपटाचे स्क्रिनिंग

नौजवान भारत सभेतर्फे शहीद भगतसिंह वाचनालय, मानखुर्द, मुंबई येथे “मृत्यू आणि निराशेचे कारखाने” ह्या माहितीपटाचे स्क्रिनिंग करण्यात आले.
अरविंद स्मृती न्यास यांच्या ‘ह्युमन लँडस्केप प्रोडक्शनद्वारे’ 2013 मध्ये निर्मित, हा माहितीपट देशाच्या राजधातील कारखान्यांमध्ये घडणारे दैनंदिन अपघात आणि औद्योगिक कामगारांच्या नरकासमान असलेल्या कामाच्या परिस्थितीवर केंद्रित आहे. जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या लोकशाहीतील कामगारांच्या जीवनाचे नारकीय वास्तव हा माहितीपट समोर आणतो.
देशातील राजधानीच्या लखलखीत भागांच्या शेजारीच औद्योगिक क्षेत्र अस्तित्वात आहे जिथे कामगार अजूनही शंभर वर्षांपूर्वीच्या परिस्थितीत काम करत आहेत. दोन वेळच्या भाकरीसाठी लाखो कामगार रोज मृत्यूच्या छायेखाली काम करतात. सुरक्षा व्यवस्थेच्या हलगर्जीपणामुळे रोज अपघात होतात आणि लोकांचा मृत्यू होतो, पण शांततेच्या पडद्याआड सर्व काही नेहमीप्रमाणे सुरू असते.
पोलिस, कारखानदार आणि राजकारणी यांच्या संगनमताने अपघातानंतर होणारे मृत्यू कसे दडपले जातात, हेही हा माहितीपट अतिशय प्रभावीपणे दाखवतो. यात कामगार कायद्यातील त्रुटी आणि कामगार किंवा त्याच्या कुटुंबाला अपघाती नुकसान भरपाईपासून वंचित ठेवण्यासाठी दलाल आणि भ्रष्ट अधिकारी कसा कट करतात हे उघडकीस आणले आहे.
ज्या प्रकारे मोदी सरकारने 44 कामगार कायदे काढून 4 कमकुवत कामगार संहिता आणल्या आहेत त्यामुळे ह्या माहितीपटाची प्रासंगिकता आणखी वाढली आहे.
स्क्रिनिंग नंतर चर्चा करण्यात आली ज्यात मानखुर्दमधील बांधकाम कामगार, महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील वाळू उत्खनन कामगार आणि मध्य प्रदेशातून गुजरातमध्ये स्थलांतरित झालेले आदिवासी शेतमजूर यांची नारकीय कामाची परिस्थिती यावर चर्चा झाली. सर्व अमानवी परिस्थितीमुळे आणि जुन्या कामगार संघटनांच्या सततच्या दलाली आणि फसवणुकीमुळे कामगार हताश झाले आहेत, परंतु संधी मिळेल तेथे ते लढतात आणि लढत आहेत. त्यामुळे नफेखोरी आणि शोषणावर आधारित ही व्यवस्था मोडून काढणे आणि मानवता आणि समतेवर आधारित समाज निर्माण करण्याच्या लढ्यात सहभागी होणे हे तरुणांचे कर्तव्य आहे.

Related posts

Leave a Comment

5 + 2 =