पुण्यात फिरत्या वाचनालयाची पुन्हा एकदा सुरुवात

पुण्यात “नौजवान भारत सभा” कडून दांडेकर पूल आणि अप्परडेपो येथील वस्त्यांमध्ये दोन वाचनालये चालवली जातात. या व्यतिरिक्त वाचनालयाच्या आजूबाजूच्या भागांमध्ये फिरते वाचनालय देखील चालवले जाते. गेले काही दिवस या फिरत्या वाचनालयाचे काम विविध कारणांमुळे स्थगित झाले होते. फिरत्या वाचनालयाच्या माध्यमातून विज्ञान, इतिहास, गणित, कथा, कादंबऱ्या अशा वेगवेगळ्या विषयांवरील शक्य तेवढी पुस्तके कामगार कष्टकरी वस्त्यांमध्ये दारोदारी नेली जातात. पुढच्या आठवड्यासाठी त्यांची वाचनाची आवड, आवश्यकता नोंदवून घेतली जाते आणि तशी पुस्तके उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो. अगोदरच्या आठवड्यातील वाचून झालेली पुस्तके परत घेतली जातात.
नौभास कडून अशा प्रकारचे उपक्रम राबवले जातात कारण भांडवलशाहीच्या अत्यंत व्यस्त जीवनशैलीमुळे आणि समाजमाध्यमांतील कुचकामी कन्टेन्टच्या भडीमारामुळे लोप पावत असलेली वाचन संस्कृती जोपासली जाणे खूप गरजेचे आहे. सोबतच सामान्य जनतेने सामाजिक – राजकीय वास्तव जाणणे , सामाजिक रूढी, अंधश्रद्धा, वैयक्तिक जीवनातील समस्या आणि आजूबाजूच्या प्रत्येक राजकीय- सामाजिक घडामोडींना अत्यंत डोळसपणे, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून बघणे, देश- दुनियेला समजून आपला सांस्कृतिक दर्जा उंचावणे देखील खूप गरजेचे आहे, जेणेकरून शोषक वर्गाच्या सांस्कृतिक, वैचारिक वर्चस्व आणि अपप्रचाराला जनता बळी पडणार नाही आणि आपल्या खऱ्या मागण्यांभोवती संघटित होऊ शकेल.
नौजवान भारत सभा संघटनेची सगळी कामे जनतेच्या आर्थिक सहयोगातून आणि स्वयंसेवकांच्या बळावर करते. तरी आम्ही तरुण- तरुणी आणि न्यायपूर्ण जनतेला फिरत्या वाचनालयासारखे उपक्रम चालवण्यासाठी सहयोग देण्याचे आवाहन करतो. तुम्ही वाचनालयाला पुस्तके भेट देऊ शकतात, आर्थिक सहयोग देऊ शकतात किंवा तुमचा वेळ सुद्धा देऊ शकतात.

Related posts

Leave a Comment

2 × four =