भगतसिंह – न्यायालय एक थोतांड आहे! (सहा सहकाऱ्यांची घोषणा)

न्यायालय एक थोतांड आहे! साम्राज्यशाहीचे हत्यार आहे!!
(सहा सहकाऱ्यांची घोषणा)

(भगतसिंह आणि सहा सहकाऱ्यांतरफे कमिशनरला [कमिशनर, विशेष न्‍यायालय, लाहोर कट खटला, लाहोर] लिहिला गेला पत्र)

कमिशनर

विशेष न्यायालय (स्पेशल ट्रिब्युनल)

लाहोर कट खटला, लाहोर.

महाशय,

आपल्या सहा सहकाऱ्यांच्या वतीने, ज्यामध्ये मीदेखील सहभागी आहे. या खटल्याच्या प्रारंभीच खालील स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे. आमची इच्छा आहे, की याची नोंद केली जावी.

या खटल्याच्या कामकाजात आम्ही कोणत्याही प्रकारे सहभागी होऊ इच्छित नाही, कारण आम्ही या सरकारला ना न्यायावर आधारित समजतो, ना ते कायदेशीरपणे स्थापले गेलेले मानतो. आम्ही ठाम विश्वासाने हे घोषित करतो की, ‘सर्व सामर्थ्याचा आधार मनुष्य आहे.’ कोणीही व्यक्ती वा सरकार अशा सामर्थ्याचे अधिकारी असू शकत नाही, जे तिला वा त्याला जनतेने दिलेले नाही. या सरकारचे अस्तित्व या तत्त्वाच्या पूर्णपणे विरुद्ध असल्याने ते अस्तित्वात राहते, हेच अनुचित आहे. जी सरकारे राष्ट्रांना लुटण्यासाठी बनत असतात, त्यांना टिकवून ठेवण्यासाठी ती (अशी सरकार) मक्तीचे आणि स्वातंत्र्याचे विचार आणि लोकांच्या रास्त इच्छा अमानुषपणे बळाने चिरडून टाकतात.

अशी सरकारे, विशेषतः असहाय असलेल्या भारतीय राष्ट्रावर जुलूम-जबरदस्तीने लादलेले गेलेले इंग्रज सरकार हे गुंड, डाकूची एक टोळी आणि लुटारूंची एक फाज आहे, असे आमचे ठाम मत आहे. जनसंहार आणि लोकांना उद्ध्वस्त करण्यासाठी या सरकारने आपल्या सर्व शक्ती एकत्रित केल्या आहेत. शांतता आणि सुव्यवस्थेच्या नावावर ही सत्‍ता आपल्‍या विरोधकांना वा आपले सत्‍य स्‍वरूप उघडे पाडणाऱ्यांना चिरडून टाकते.

आमचे असेही ठाम मत आहे की साम्राज्‍यवाद हे दुसरे तिसरे काही नसून दरोडेखोरीचे एक मोठे कारस्‍थान आहे. साम्राज्‍यवाद म्‍हणजे मानवाकडून मानवाच्‍या आणि राष्‍ट्राकडून राष्‍ट्राच्‍या शोषणाची परमावधी आहे. आपल्‍या स्‍वार्थासाठी आणि लुटालुटीच्‍या योजना पार पाडण्‍यासाठी साम्राज्‍यवादी केवळ कायदे आणि न्‍यायालये यांचाच खून करत नाहीत, तर भीषण हत्‍याकांडेदेखील घडवून आणतात. शोषणाची आपली भूक शमवण्‍यासाठी युद्धासारखे भयंकर गुन्‍हेदेखील करतात. जिथे कुठे त्‍यांच्‍या नादिरशाहीला शोभतील अशा शोषणाच्‍या मागण्‍या मान्‍य करायला लोक नकार देतात किंवा त्‍यांच्‍या विनाशकारी, घृणास्‍पद कट कारस्‍थानांना गुपचूप संमती देण्‍यास विरोध करतात, अशा वेळी निरपराध्‍यांचे रक्‍त सांडायला ते मागेपुढे पाहत नाही. शांतता आणि सुव्‍यवस्‍थेच्‍या नावाखाली ते शांतता आणि सुव्‍यवस्‍थाच उद्ध्‍वस्‍त करतात. हाहा:कार माजवत लोकांच्या हत्या करतात, टोकाचा अत्याचार करतात.

स्‍वातंत्र्य हा प्रत्‍येक माणसाचा अनुल्‍लंघनीय अधिकार आहे, असे आम्ही मानतो. प्रत्‍येक माणला आपल्‍या श्रमाचे फळ उपभोगण्‍याचा पूर्ण अधिकार आहे आणि प्रत्‍येक राष्‍ट्र आपल्‍या नैसर्गिक साधनसंपत्‍तीचे पूर्ण मालक आहे. जर कोणतेही सरकार जनतेला तिच्‍या या मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवत असेल, तर असे सरकार नष्‍ट करणे हा जनतेचा केवळ अधिकारच नव्‍हे, तर तिचे ते आवश्‍यक कर्तव्‍यदेखील बनते. ज्‍या तत्‍त्‍वांसाठी आम्‍ही लढत आहोत, अशा तत्‍त्‍वांच्‍या पूर्णतया विरुद्ध असलेल्‍या या ब्रिटिश सरकारचा समूळ उच्‍छेद करण्‍यासाठी, देशामध्‍ये येन केन प्रकारेण क्रांती घडवण्‍यासाठी अवलंबले जाणारे सगळे प्रयत्‍न आणि सर्वच पद्धती नैतिकदृष्‍ट्या योग्य आहेत असा आमचा ठाम विश्‍वास आहे. वर्तमान व्‍यवस्‍थेच्‍या सामाजिक, आर्थिक आणि राजनीतिक क्षेत्रांमध्‍ये क्रांतिकारक परिवर्तन घडवण्याच्‍या बाजूचे आम्‍ही आहोत. सध्‍याच्‍या समाजाचे एका संपूर्णपणे नव्‍या सुगठित समाजामध्‍ये परिवर्तन करू इच्छितो. अशा तऱ्हेने माणसाकडून माणसांचे होणारे शोषण अशक्‍य करून सर्वांना सर्व क्षेत्रांमध्‍ये संपूर्ण स्‍वातंत्र्य, हे एक वास्‍तव बनावे. जोवर संपूर्ण सामाजिक व्‍यवस्‍था बदलून टाकली जात नाही आणि त्‍या जागी समाजवादी समाजाची स्‍थापना होत नाही, तोवर संपूर्ण जग एका विनाशकारी प्रलय-संकटामध्‍ये आहे, असे आम्‍हांला जाणवते आहे.

क्रांतिकारक आदर्शांची प्रतिष्‍ठापना शांततामय वा अन्‍य मार्गाने करण्‍याचा जो प्रश्‍न आहे, त्‍याबद्दल  आम्‍ही असे मानतो की त्‍याचा निर्णय तत्‍कालीन शासकांच्‍या इच्‍छेवर अवलंबून आहे. मानवतेबद्दल प्रेम हा आपला स्‍थायिभाव असलेले क्रांतिकारक हे मानवतेचे पूजक आहेत. आम्‍हांला शाश्‍वत आणि खरीखुरी शांतता हवी आहे आणि न्‍याय व समानता हेच तिचा आधार आहेत. भ्‍याडपणातून निर्माण होणाऱ्या आणि भाले व बंदुकांच्‍या आधारे टिकून राहणाऱ्या खोट्या आणि दिखाऊ शांततेचे आम्‍ही समर्थक नाही. क्रांतिकारक बॉम्‍ब आणि पिस्‍तुलांचा आधार घेतो कारण तसे करणे अगदी निकडीचे व त्‍याच्‍या दृष्‍टीने अत्‍यावश्‍यक बनलेले असते म्‍हणून, शेवटचा उपाय म्‍हणून. शांतता आणि कायदा हे माणसांसाठी आहेत, माणूस शांततेसाठी आणि कायद्यासाठी नाही असा आमचा ठाम विश्‍वास आहे.

स्‍वातंत्र्य संपुष्‍टात आणणे व त्‍यावर निर्बंध घालणे ही कायद्याची आंतरिक प्रेरणा नसून तर स्‍वातंत्र्याचे रक्षण करणे आणि त्‍याचा विकास करणे ही आहे, हे फ्रान्सच्या उच्च न्यायाधीशांचे म्हणणे अगदी योग्य आहे. सामूहिक हितासाठी बनवल्या गेलेल्या आणि ज्या जनतेसाठी बनवण्यात आले आहेत, त्या जनतेच्या इच्छा आकांक्षांचा आधार लाभलेल्या कायद्यांमधूनच सरकारला कायदेशीर सामर्थ्य प्राप्‍त होते. अगदी कायदे बनवणाऱ्यासह (विधायक) कोणीही याला अपवाद असू शकत नाही.

कायदा जोपर्यंत जनतेचे मानस म्‍हणजे तिच्‍या भावना प्रकट करतो, तोपर्यंतच कायद्याचे पावित्र्य टिकून राहते. तो जेव्‍हा शोषक समूहांच्‍या हातातला कागदाचा कपटा बनून जातो, तेव्‍हा त्‍याचे पावित्र्य आणि महत्‍त्‍व तो हरवून बसतो. न्‍याय द्यायचा तर प्रत्‍येक प्रकारच्‍या लाभांचा आणि हितसंबंधांचा खातमा करणे ही मूलभूत गोष्‍ट आहे. कायदा जसजसा सामाजिक गरजा भागवणे बंद करत जातो; तसतसा तो जुलूम आणि अन्‍याय वाढवण्‍याचे हत्‍यार बनत जातो. असे कायदे चालू ठेवणे याचा म्हणजे सार्वजनिक हितावर विशेष हितसंबंधांची ढोंगी जबरदस्‍ती आहे, दुसरे काहीही नाही,

सध्याच्या सरकारचे कायदे हे परकीय शासनाच्या हितासाठी चालवले जातात आणि ते आमच्या हिताच्या विरोधात आहेत. त्यामुळे या कायद्यांचे कोणत्याही प्रकारे सुयोग्य आचरण करण्याचा मुद्दाच आम्हाला लागू होत नाही.

म्हणून या कायद्यांना आव्हान देणे आणि त्यांचे उल्लंघन करणे, हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य बनते, शोषणाचेच एक अंग असलेली इंग्रज न्यायालये न्याय देऊ शकत नाहीत. विशेषतः जिथे सरकार आणि लोकांचे हित यामध्ये संघर्ष आहे अशा राजकीय क्षेत्रात तर नाहीच. आम्हाला हे ठाऊक आहे, की हे न्यायालय न्यायाच्या थोतांडाशिवाय अन्य काहीही नाही.

याच कारणाने आम्ही यामध्ये सहभागी होण्यास नकार देत आहोत, आणि म्हणून या खटल्याच्या कामकाजात आम्ही भाग घेणार नाही.

१. भगतसिंह, २. जितेंद्रनाथ सान्याल, ३. महावीरसिंह, ४. बटुकेश्वर दत्त, ५. गयाप्रसाद आणि ६. कुंदनलाल.

५ मे १९३०

न्यायाधीशांची टिप्पणी – हे रेकॉर्डवर ठेवले जावे, पण याची प्रत दिली जाऊ नये, कारण यामध्ये काही नको असलेल्या गोष्टी लिहिलेल्या आहेत.

Related posts

Leave a Comment

one + 9 =