चला, सावित्रीबाई फुलेंचा लढा पुढे नेऊयात ,
नव्या ज्ञानबंदीच्या विरोधात,
सर्वांना मोफत शिक्षणासाठी, कटिबध्द होऊयात…!
आज सावित्रीबाई फुलेंची जयंती. तब्बल 171 वर्षांपूर्वी ब्राम्हण्यवाद्यांशी वैर पत्करून, पुण्याच्या भिडे वाड्यात सावित्री-जोतिरावांनी मुलींसाठी शाळा सुरू केली. ही एक क्रांतिकारी घटना आहे. पिढ्यान् पिढ्या शुद्रातीशूद्रांवर जे अनेकोनेक प्रतिबंध लादले होते, त्यापैकी “ज्ञानबंदी”ने शुद्रातीशूद्र व स्त्रियांचं अतोनात नुकसान केलं आहे. या भूमिकेतून वंचितांसाठी शिक्षणाचा गंभीर प्रयत्न सावित्री-जोतिराव या दांपत्याने केला. ही घटना मनुस्मृतीने कायदेशीर ठरवलेल्या ज्ञानबंदीच्या विरोधातला जोरदार विद्रोह होता. या संघर्षात प्रसंगी दगड, माती, शेणाचा मारा अंगावर झेलूनही न डगमगता दृढतेने सावित्रीबाई शिक्षणाचं हे महत्कार्य करतच राहिल्या.
इंग्रजांनी भारतात ज्या औपचारिक शिक्षणाची सुरुवात केली, त्याचा उद्देश “शरीरानं भारतीय पण मनानं इंग्रज” असणाऱ्या कारकुनाची पैदास करणं हाच होता. जोतिराव–सावित्री यांनी मात्र सातत्यानं वैज्ञानिक व तार्किक शिक्षणाचा आग्रह धरला आणि प्रामुख्यानं प्राथमिक शिक्षणाच्या सक्तीची व अग्रक्रमाची भूमिका घेतली. आज मात्र तर्कावर कुठेही न टिकणाऱ्या ज्योतिषशास्त्राला अभ्यासक्रमाचा भाग बनवण्याचा प्रयत्न होतोय. म्हणजे मुलांच्या प्राथमिक शिक्षणाची सुरुवातच अतार्किक आणि अवैज्ञानिक अशा पाठयक्रमांनी होताना आपण पहात आहोत.
जोतिराव-सावित्री शिक्षणाचं हे कार्य सुरू करताना आणि नंतरही प्रस्थापित राज्यसत्तेवर विसंबून राहिले नाहीत, मग तो मुलींच्या शाळेचा प्रयत्न असो, नाहीतर प्रौढ साक्षरतेचे प्रयत्न असोत. स्वतः पुढाकार घेवून त्यांनी हे काम चालू ठेवलं. अडचणी व संकटांचा सामना अत्यंत धाडसानं आणि धीरानं केला. शिक्षणाच्या क्षेत्रात इतके क्रांतिकारी काम करणार्या सावित्रीबाईंचा जन्मदिवसच खरा ‘शिक्षक दिन’ होऊ शकतो, पण विपर्यास असा आहे की एका अशा व्यक्तींचा जन्मदिवस शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातोय ज्यांच्यावर प्रबंध चोरीचा आळ तर आहे शिवाय जो चातुर्वर्ण्याचे समर्थन करतो.
आज मात्र स्वातंत्र्यानंतर राज्यसत्तेनं शिक्षणाच्या जबाबदारीपासून हात वर केले आहेत आणि 1991 च्या खासगीकरण, उदारीकरणाच्या नीतीसाठी तर शिक्षणाला बाजारात आणून बसवलं आहे. सरकारी शाळांची दैन्यावस्था आणि वारेमाप खाजगी शिक्षण संस्था व मनमानी कारभार आणि तीव्र आर्थिक शोषणामुळं अगोदरच हातभर लांब असलेले शिक्षण सामान्यांच्या, गरिबांच्या क्षमतेबाहेर गेलेय. आज कुठलाही सामान्य माणूस आपल्या पाल्याला हवे ते शिक्षण देण्याचे, डॉक्टर, इंजिनियर बनवण्याचं स्वप्न बघू शकत नाही अशी अवस्था आहे. स्वातंत्र्याच्या 71 वर्षांनतरही साक्षरतेचं प्रमाण 64% च्या आसपासच पोहचलं आहे. आज पुन्हा उच्च शिक्षणाचे आणि एकूणच शिक्षणाचे दरवाजे पैसेवाल्यांसाठीच खुले आहेत. शिक्षणाची अत्यंत सृजनशील व आनंददायी क्रिया, शिक्षण माफीयांसाठी खात्रीलायक सोन्याचे अंडे देणारी कोंबडी झाली आहे. सक्तीचे शिक्षण, शिष्यवृत्या व आरक्षण फक्त एक बुजगावणेच उरली आहेत. आज पुन्हा एकदा कष्टकऱ्यांसाठी नव्याने ज्ञानबंदी लादली गेली आहे. आजच्या प्रसंगी सावित्रीबाईंची आठवण करत असताना त्यांनी सुरू केलेला संघर्ष आपण कुठपर्यंत पुढे आणला आहे याचा विचार करावा लागेल व नव्यानं निर्माण झालेल्या ज्ञानबंदीला धुडकावण्यासाठी सर्व श्रमिकांच्या एकजूटीचे आवाहन करत, सर्वाना मोफत शिक्षणासाठीचा संघर्ष पुढे न्यावा लागेल.
सावित्रीबाई स्वतःच्या प्रयत्नातून साक्षर झाल्या, पुढे शिक्षकही झाल्या. सामाजिक प्रश्नांबाबत तर त्यांनी अतिशय क्रांतिकारी भूमिका घेतल्याच, पण जोतिराव फुलेच्या मृत्यूनंतर मागे हटल्या नाहीत, तर अंतिम श्वासापर्यंत जनतेची सेवा करत राहिल्या आणि शेवटीसुद्धा पुण्यातल्या प्लेगच्या साथीत लोकांची सेवा करतानाच त्यांना मरण आले. त्यांच्या संघर्षपूर्ण आयुष्याला दिशा विद्यार्थी संघटना क्रांतिकारी अभिवादन करत आहे व सर्वांना मोफत शिक्षण-सर्वांना काम मिळवण्याच्या संघर्षात सहभागी होण्याचे आवाहन करत आहे.
ब्राम्हण्यवाद मुर्दाबाद ! भांडवलशाही मुर्दाबाद !
सर्वांना मोफत शिक्षण , सर्वांना काम !
इंकलाब जिंदाबाद!
दिशा विद्यार्थी संघटना नौजवान भारत सभा
स्त्री मुक्ति लीग
फेसबुुुक – www.facebook.com/nbsmaharashtra वेबसाइट – www.ma.naubhas.in
मुम्बई संपर्क – 9619039793, 9145332849
पत्ता : शहीद भगतसिंह पुस्तकालय,
कमरा न.204, 7B, हिरानंदानी बिल्डिंग, लल्लुभाई कम्पाउण्ड, मानखुर्द, मुंबई
अहमदनगर संपर्क – 9156323976, 8888350333
पत्ता : शहीद भगतसिंह पुस्तकालय, गुगळे क्लिनिकच्या पाठीमागे , सिद्धार्थनगर, अहमदनगर
पुणे संपर्क – 9422308125