नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे सुरु असलेल्या साप्ताहिक अध्ययन चक्राच्या शृंखलेत ‘शहिद अशफाक उल्ला खाँ यांचा जीवन परिचय’ ह्या विषयावर शहीद अशफाक उल्ला खाँ यांच्या जन्मदिवसानिमित्ताने (22 ऑक्टोबर) चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.
सत्राच्या सुरवातीला शशांकने मांडले की आपल्याला अशफाक उल्ला खाँ यांचा परिचय काकोरी कांड किंवा त्यांची राम प्रसाद बिस्मिल यांच्यासोबत असलेली मैत्री एवढाच करून दिला जातो पण त्यांचे विचार आणि भारताच्या स्वातंत्र लढ्यात त्यांचे योगदान यावर फार कमी चर्चा केली जाते. अविनाशने अशफाक उल्ला खाँ यांचे भारताच्या स्वातंत्र्याविषयी काय विचार होते यावर प्रकाश टाकला. स्वातंत्र्याचा नेमका अर्थ काय, भारताला फक्त इंग्रजांपासून नाही तर देशात असलेली असमानता, वर्गभेद, जातीभेद, धर्मभेद यांपासून सुद्धा स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. एका समता मूलक स्वतंत्र देशाचं स्वप्न अशफाक उल्ला खाँ यांनी पाहिलं होतं आणि त्यासाठी ते आयुष्यभर संघर्ष करत राहिले. ब्रिटिश सत्तेद्वारे भारतीयांवर केला जाणारा अन्याय ते सहन करू शकले नाहीत, शाळेत असतांनाच ते रामप्रसाद बिस्मिल यांच्या संपर्कात आले आणि पुढे जाऊन त्यांनी क्रांतिकारी संघटन ‘हिंदुस्थान रिपब्लिक असोसिएशन’ ची स्थापना करण्यात अग्रणी भूमिका निभावली. काकोरी कांड, ज्यामध्ये त्यांनी इंग्रजांनी भारतातील सामान्य जनतेला लुटून आणलेला खजिना लुटला, ज्याचा वापर ते ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढण्यासाठी करणार होते आणि ज्यामुळे त्यांना ब्रिटीश सरकार ने फाशी ची शिक्षा सुनावली.
चर्चा सत्रात पुढे आजचा भारतीय समाज समतामूलक आहे किंवा नाही ह्यावर चर्चा झाली. शहाबुद्दीन, सोनी आणि फुल्लो यांनी आपली मते मांडतांना सांगितले कि नोटबंदी, लॉकडाऊन, वाढती महागाई यावर सरकार चे निर्णय आणि योजना सामान्य जनतेच्या विरोधात आहेत आणि सामान्य लोकांचे जीवन दिवसेंदिवस खडतर होत चालले आहे. कष्टकरी वस्त्या ह्या नशाखोरीचे आणि गुन्हेगारी चे अड्डे बनल्या आहेत, स्त्रियांना सुरक्षा नाही. पोलीस यंत्रणा हि जे चालू आहे तेच टिकवण्याचा प्रयत्न करताना दिसते. नगरसेवक तर फक्त खोट्या आश्वासनांची मनोरे बांधताना दिसतात. अविनाशने पुढे मांडलं की जोपर्यंत समाजात एकता आणि समानता प्रस्थापित होत नाही तोपर्यंत परिस्थिती बदलू शकत नाही. शहीद अशफाक उल्ला खाँ यांचे स्वप्न पुढे जाऊन भगतसिंह व इतर क्रांतिकारकांनी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. हिंदुस्थान रिपब्लिक असोसिएशन’ ला पुढे चालू ठेवत त्याच्या नावात ‘सोशलिस्ट’ हा शब्द जोडून क्रांतीचा संघर्ष अधिक व्यापक करत कामगारांच्या सत्तेचा विचार देशातील तरुणांसमोर ठेवला, तरुणांना, विद्यार्थ्यांना क्रांतीसाठी स्वतःचे योगदान सुनिश्चित करण्याचे आवाहन केले. त्यांना असा समाज निर्माण करायचा होता जिथे फक्त मूठभर श्रीमंत लोक करोडो कष्टकरी जनतेवर राज्य करणार नाहीत तर सर्वांना सामान अधिकार आणि सुविधा मिळतील, जिथे एका माणसाकडून दुसऱ्या माणसाचे शोषण होणार नाही.
सत्राच्या शेवटी उपस्थित सर्वांनी संकल्प घेतला गेला कि महान क्रांतिकारी शहिद अशफाक उल्ला खाँ यांच्या जीवनसंघर्षातून आणि विचारांतून प्रेरणा घेऊन देशात सुरु असलेला सांप्रदायिक उन्माद, अन्याय, विषमता, पितृसत्ता, जातीवाद, लोकशाही अधिकाऱ्यांवरील हल्ले, कामगारांचं वाढतं शोषण यांविरोधात अविरत संघर्ष करू.

