“आमच्या मते क्रांती म्हणजे अन्यायावर आधारलेल्या प्रचलित समाजव्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन.
समाजाचे प्रमुख अंग असूनही आज कामगारांना त्यांच्या प्राथमिक हक्कापासून वंचित ठेवले जाते. शोषण करणारे भांडवलदार त्यांच्या निढळाच्या कमाईतून निर्माण होणारी सर्व संपत्ती हडपून टाकतात. दुसऱ्याचे अन्नदाते असणारे शेतकरी आज त्यांच्या कुटुंबासह एकेका दाण्यासाठी मोताद बनले आहेत. जगभराच्या बाजारपेठांसाठी कपडे उपलब्ध करून देणाऱ्या विणकऱ्याला आपल्या पोराबाळांचे झाकण्याइतके देखील कपडे मिळत नाहीत. सुंदर महाल निर्माण करणारे गवंडी, लोहार, सुतार स्वतः मात्र घाणेरड्या अवस्थेत राहून आपली जीवन यात्रा समाप्त करतात. या विपरीत समाजातील शोषक भांडवलदार त्यांच्या छोट्या मोठ्या लहरीखातर लाखो कोट्यावधींची उधळपट्टी करतात.
ही भयानक विषमता आणि जबरदस्तीने लादला गेलेला भेदभाव जगाला एका महाभयंकर उलथापालथीकडे घेऊन जाणे अटळ आहे. ही स्थिती अधिक काळ टिकून राहणे शक्य नाही. आजचा धनिक समाज एका भयंकर ज्वालामुखीच्या तोंडावर बसून चैनबाजी करीत आहे व शोषकांची निरागस मुले आणि कोटयवधी शोषित माणसे एका उंच कड्यावरून चालत आहेत, हे अगदी उघड आहे.”
(असेंम्बली बॉम्ब प्रकरणाच्या सत्र न्यायालयातील निवेदनातून)
नौजवान भारत सभे तर्फे शहिदे आझम भगतसिंह यांच्या जन्म दिवसानिमित्त मुंबईत सुरू असलेल्या शहीद यादगारी अभियानाचा शेवट तुर्भे येथील प्रवासी कामगारांच्या वस्तीत करण्यात आला. अभियानांतर्गत (राजा का बाजा) नाटक, क्रांतिकारी गीत प्रस्तुत करण्यात आले. पत्रके वाटली गेलीत व भगतसिंहाच्या विचारांची आजच्या काळात प्रासंगिकता यावर चर्चा झाली. तसेच ‘ द लेजंड ऑफ भगतसिंग ‘ हा चित्रपट दाखवण्यात आला.
नौजवान भारत सभा हे भगतसिंह व त्यांच्या साथीदारांच्या क्रांतिकारी विचारांवर काम करणारे संघटन आहे. शहिदे आझम भगतसिंह, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, राम प्रसाद बिस्मिल, अश्फाक उल्ला खान ह्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राण ही त्यागणाऱ्या क्रांतिकारकांच्या विचारातले, स्वप्नातले स्वातंत्र्य आजही अपूर्ण आहे. त्यांना एक समता मूलक समाज हवा होता ज्यात एका माणसाकडून दुसऱ्या माणसाचं शोषण होणार नाही, श्रीमंत – गरीब, मालक – कामगार हा भेद राहणार नाही.
ह्याचं विचारांवर नौजवान भारत सभा काम करते आणि देशातील तरुणांना देखील शहीदे आझम भगतसिंहाचे विचार आत्मसात करण्यास प्रेरित करते.
क्रांतिकारकांच्या अपूर्ण स्वतंत्र्याच्या स्वप्नाला पूर्णत्व देण्यासाठी, क्रांतीच्या, अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याच्या वाटेवरील सोबती, साथी बनण्याचे आव्हान नौजवान भारत सभा सर्व न्यायप्रिय, संवेदनशील तरुणांना करत आहे.
