विषारी धूर पसरवत असलेल्या एस.एम.एस. कंपनी (बायोवेस्ट ट्रीटमेंट प्लांट) च्या जागेचा परवाना रद्द करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका एम-पूर्व विभाग कार्यालयासमोर तीव्र विरोध निदर्शने…
दि.19/09/2022 रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एम-पूर्व विभागीय कार्यालयासमोर नौजवान भारत सभा, एस.एम.एस. हटाओ संघर्ष समिति व अन्य सहयोगी संघटनांनी तीव्र विरोध निदर्शने केली.
दरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिका एम पूर्व विभाग सहाय्यक आयुक्तांशी “एस.एम.एस. हटाओ संघर्ष समिति” कडून निवडण्यात आलेल्या शिष्ट मंडळाशी चर्चा झाली. चर्चेत समितीच्या वतीने प्रश्न उपस्थित करण्यात आले की, पालिकेच्या मालकी हक्काची जागा विषारी दूर पसरवत असलेल्या कंपनीला का देण्यात आली? या जागेसंबंधी झालेला करार हा 2021 मध्ये संपलेला असताना सुद्धा अजून देखील एस.एम.एस. कंपनी या जागेवर का कार्यरत आहे? बृहन्मुंबई महानगरपालिका या जागेचा परवाना का रद्द करत नाही? तेव्हा आयुक्तांनी पहिल्यांदा मान्य केले की, एस.एम.एस. कंपनी चालत असलेली जागा ही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मालकी हक्काची आहे. मुख्य कार्यालया बरोबर पत्रव्यवहार करून या जागेबाबत पालिकेच्या भूमिकेला एका आठवड्याच्या कालावधीत स्पष्ट करत असताना एस.एम.एस. हटाओ संघर्ष समितीला लेखी माहिती देण्यात येईल.
मागील अनेक वर्षांपासून एस.एम.एस. कंपनीच्या धुरामुळे या विभागात राहत असलेल्या दहा ते बारा लाख लोकांच्या आयुष्याबरोबर राजरोसपणे खेळले जात आहे. अनेक लोकांना दमा, टि.बी., अस्थमा, कॅन्सर, त्वचेचे रोग, श्वासाचे रोग अशा अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे.
एस.एम.एस. कंपनी, पर्यावरण विभाग, बी.एम.सी आणि राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला. मागील अनेक दिवसांपासून कंपनी स्थलांतरित होण्यासंबंधी आश्वासने आणि चर्चेच्या स्तरावर बोलले जात आहे पण प्रत्यक्षात काहीच काम होतांना दिसत नाही. उलट शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेत आल्या नंतर एस.एम.एस कंपनी अजून जास्त क्षमतेने सुरू करण्यासाठी पायाभूत संरचनेची उभारणी केली जात आहे.
निदर्शने झाल्यावर देवनार पोलिसांनी नौजवान भारत सभेच्या तीन कार्यकर्त्यांना अटक केली होती. जनदबावामुळे कार्यकर्त्यांना लगेच सोडून देण्यात आले.


