शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या!! एन. टी. ए. खारीज करा!

गेल्या काही दिवसांपासून देशभरात गाजत असलेल्या NEET-UG परीक्षेत झालेल्या घोटाळ्याविरोधात आणि नुकत्याच समोर आलेल्या यूजीसी नेट परीक्षेत झालेल्या घोटाळ्याविरोधात पुणे येथे नौजवान भारत सभा व दिशा विद्यार्थी संघटना यांच्यातर्फे विरोध प्रदर्शन आयोजित करण्यात आले. 33 लाख विद्यार्थ्यांचे भविष्य अनिश्चिततेत व अंधकारात ढकलणारे हे घोटाळे काही पहिले घोटाळे नाहीत. या घोटाळ्यांमध्ये प्रस्थापित राजकारण्यांपासून तर अधिकारी वर्ग सुद्धा सहभागी आहे. हे घोटाळे बंद करून पारदर्शक पद्धतीने परीक्षा पद्धती लागू व्हावी व घोटाळेबाज लोकांवर कडक कारवाई करण्यात यावी, शिक्षणाचे खाजगीकरण बंद करावे इत्यादी मागण्यांसह आज 23 जून रोजी नौजवान भारत सभा व दिशा विद्यार्थी संघटना यांच्यातर्फे विरोध प्रदर्शन करण्यात आले. दिशा विद्यार्थी संघटनेकडून आपले मत मांडताना साथी सुप्रिथ यांनी मांडले की गेल्या दहा वर्षात मोदी सरकारच्या कार्यकाळात 80 हून अधिक परीक्षांमध्ये घोटाळे झालेले आहेत. सामान्य विद्यार्थ्यांसाठी ह्या परीक्षांच्या माध्यमातून उच्च शिक्षणापर्यंत आणि नोकरीपर्यंत पोहोचण्याची जी काही थोडीफार संधी उपलब्ध होते ती सुद्धा पैशाच्या बळावर घोटाळे करून धनदांडगे लोक हिसकावून घेत आहेत. या विरोधात विद्यार्थी वर्गाने आपला आवाज बुलंद करत व एकजूट होत पारदर्शक पद्धतीने परीक्षा प्रणाली लागू करण्यासाठी सरकारवर दबाव बनवावा. सोबतच घोटाळेबाज लोकांवर कडक कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी ही साथी सूप्रिथ यांनी दिशाच्या वतीने केली.
नौजवान भारत सभेकडून बोलताना साथी रवी यांनी मांडले की परीक्षांमध्ये होणारी घोटाळे हे या नफेखोर भांडवली व्यवस्थेमधील केवळ एक लक्षण आहे. या व्यवस्थेमध्ये प्रत्येक गोष्ट विक्रीसाठी काढली जाते मग ते शिक्षण असो वा आरोग्य. त्याचाच परिणाम म्हणून भ्रष्टाचार करून परीक्षांमध्ये घोटाळे करून अभ्यासक्रमांमधील जागा सुद्धा पैसेवाल्यांना विकल्या जातात. तात्कालीक स्वरूपात घोटाळे थांबवून पारदर्शक पद्धतीने परीक्षांचे आयोजन तर झालेच पाहिजे परंतु सोबतच तरुण विद्यार्थी वर्गाने एकंदरीत या बाजारू शिक्षण व्यवस्थेवर आणि नफेखोर व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करून तिला मुळापासून बदलवण्यासाठी एकजूट झाले पाहिजे.
आंदोलनात दिशा विद्यार्थी संघटनेकडून वेदांत, प्रगतिशील डॉक्टर्स लीग कडून अर्चना आणि नौजवान भारत सभा कडून साथी सुस्मित यांनी मत मांडले.
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या!!
एन. टी. ए. खारीज करा!
एन. टी. ए. अध्यक्ष प्रदीप जोशी राजीनामा द्या!
परीक्षांमध्ये घोटाळे नाही चालणार!
सर्वांना मोफत समान शिक्षण मिळालेच पाहिजे!
सर्वांना पक्का रोजगार मिळालाच पाहिजे.
इंकलाब जिंदाबाद!
या घोषणांनी आंदोलनाचा शेवट झाला.

Related posts

Leave a Comment

19 − eight =