___________________
133 दांडेकर पूल येथील झोपडपट्टी पाडण्याच्या कारवाईनंतर सचेतन झालेल्या विविध झोपडपट्ट्यांमधील नागरिकांनी, आज एकता दर्शवत आणि घरांच्या, विस्थापनाच्या, एस.आर.ए.च्या संदर्भात चालू असलेल्या अन्यायाला, लपवालपवीला, दडपशाहीला समोर आणत दांडेकर पूल चौक येथे आज आज 11 ऑगस्ट रोजी, सकाळी 10:30 वाजता आंदोलन केले.
यावेळी 133 दांडेकर पूल, 52 चाळ, 214 दांडेकर पूल, पानमळा वसाहत, शाहू वसाहत, हनुमान नगर या वसाहतींमधील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नौजवान भारत सभेचे निखिल एकडे यांनी सूत्रसंचालन केले. नौजवान भारत सभेतर्फे समन्वयक रवी पुर्णे, 133 दांडेकर पूल येथील हनुमंत फडके, पानमळा येथील किशोर कांबळे, शाहू वसाहत येथील साधू नवाडे, भारताचा क्रांतिकारी कामगार पक्षातर्फे (RWPI) परमेश्वर जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सर्व वस्त्यांमधील प्रतिनिधींनी मांडले की माहिती लपवून, लोकांना विश्वासात न घेता ओढ्याचा मार्ग बदलण्याचे काम चालू आहे आणि लोकांना अंधारात ठेवून सक्तीने विस्थापन केले जात आहे. प्रत्येकच वसाहतीतील प्रकल्पाबद्दल कोणतीही पारदर्शकता दाखवली जात नाही आणि लोकांमध्ये फूट पाडून पात्र-अपात्रचा भेद वापरून बिल्डर आपला फायदा वाढवत आहेत. काही वसाहतींमध्ये सक्तीने नागरिकांच्या सह्या घेऊन प्रकल्प लादण्याचे प्रयत्न चालू आहेत, असेही समोर आले. RWPI तर्फे पाठिंबा देत कॉम्रेड परमेश्वर जाधव यांनी मांडले की फक्त कामगार वर्गीय पक्षच घरकुलांचा अधिकार खऱ्या अर्थाने सर्वांना देऊ शकतो, जेव्हा की भांडवली पक्षांचे कामच कामगार वर्गात फूट पाडून बिल्डर-भांडवलदारांचे हित साधणे, आणि कामगार-कष्टकऱ्यांना अधिकार डावलणे हे आहे.
नौजवान भारत सभेतर्फे रवी पुर्णे यांनी आपले मत व्यक्त करताना मांडले की सर्व भांडवली पक्ष बिल्डरधार्जीणेच आहेत आणि बिल्डरांचा नफा वाढवण्याकरिता नेहमीच पात्र-अपात्रचा खेळ खेळला जातो, जेव्हा की मेहनत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पात्र मानणे आणि सर्वांना घर पुरवणे ही शासनाची जबाबदारी असली पाहिजे. आपसात जातींमध्ये न विभागता, भांडवली पक्षांच्या प्रलोभनांना न भुलता आपली एकता टिकवणे ही सर्वांची जबाबदारी आहे.
आंदोलनातर्फे खालील मागण्या मांडण्यात आल्या:
133 दांडेकर पूलाच्या कारवाईबद्दल, महाविकास आघाडी सरकारने आयुक्त, पोलिस आयुक्तांना निलंबित करावे!
मनपा मधील सत्ताधारी भाजपाने सर्व पाडलेली घरे बांधून द्यावीत, आयुक्तांच्या कारवाईची जबाबदारी घ्यावी!
सर्व जबाबदार अधिकाऱ्यांवर उच्च न्यायालयाच्या अवमानाचा खटला दाखल केला जावा.
नागरिकांना योजना व योजनेसंबंधीत चालू प्रक्रियेची सर्व माहिती तात्काळ द्या.
नागरिकांना विश्वासात न घेता ओढ्याचा मार्ग बदलू नका!
पात्र-अपात्रांचा भेद न करता सर्व स्थानिक नागरिकांना आवासाचा अधिकार मिळालाच पाहिजे.
नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय व संमतीशिवाय कुठल्याही पद्धतीचे विस्थापन करू नका.
सर्व प्रकल्पग्रस्तांना चांगली, प्रशस्त, पक्की घरकुलं तातडीने भोगवटा आधारावर राहण्यास द्या.
सर्व रिकामी घरं सरकारने जप्त करावीत आणि बेघरांना, झोपडपट्टीधारकांना भोगवटा तत्वावर राहण्यास द्यावी.
*नौजवान भारत सभा, पुणे*
*संपर्क पत्ता:* शहीद भगतसिंह वाचनालय, बिडकर चौक, सर्वे नं 133, दांडेकर पूल, पुणे
*संपर्क:* 8956840785, 9970576130
*ई-मेल:* naubhas.pune@gmail.com
*वेबसाईट:* http://naubhas.in
